मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

महागडे आॅम्लेट ( भाग तीन )


लॉज मध्ये रूम घेवून आम्ही आराम करत त्याच्या वडिलांच्या फोन ची वाट पहात होतो ..सकाळी आठ वाजता.. तो घरी आलाय मात्र एका खोलीत जावून ..दार लावून आत बसलाय असा फोन आला वडिलांचा ..वडील आम्हाला बोलावतील असा त्याला पक्का संशय होता हे सिद्ध झाले ..आम्ही ताबडतोब त्याच्या घरी पोचलो ..त्याला खोलीतून बाहेर कसे काढायचे या बद्दल आम्ही बराच खल केला ..वडिलाना दार वाजवायला सांगितले ..मात्र तो काही केल्या दार उघडायला तयार होईना..आमची गाडी त्याच्या घरी पोचली आहे हे बहुधा त्याच्या गावातील मित्राने त्याला फोन करून संगितले असणार ..तो आतूनच वडिलांना शिव्या घालू लागला ..मैत्रीच्या लोकांना परत पाठवा तरच दार उघडतो असे म्हणून लागला ..आम्ही दाराला धक्के मारले तर आतून ओरडला ..तुम्ही जास्त आग्रह केला तर मी आत फास लावून घेईन स्वतःला ..आम्ही त्याच्याशी बाहेरून बोललो ..तुला काही करत नाही कोणी ..आम्ही नेणार नाही तुला ..फक्त आमच्याशी एकदा समोरासमोर बोल तू ..मात्र तो दार उघडण्यास तयार होईना ..काय करावे काही सुचत नव्हते ..एकदा असेही वाटले की जावू दे आपण परत निघून जावू ..कारण दार उघडण्याचा जास्त आग्रह केला तर तो काही बरेवाईट करेल रूममध्ये..मात्र त्याचे वडील आम्ही त्याला घेवून जावे या बाबत खूप आग्रही दिसले ..त्याला सुरक्षित बाहेर काढण्या साठी मग आम्ही एक आयडिया केली ..मुद्दाम त्याच्या वडिलांशी त्याला ऐकू जाईल असे मोठ्याने बोललो ' अंकल जाने दिजिये ..इस बार इसे छोड देते है..अगर फिर शराब पिया या कोई गडबड की तो दुबारा आयेंगे .." बोलता बोलता आम्ही त्याच्या वडिलांना डोळा मारला ..ते समजले हे नाटक आहे म्हणून ..ते देखील मोठ्याने म्हणाले " लेकीन इसने एक बार पिना शुरू किया तो ये फिरसे अपने आप पार कंट्रोल नही रख पाता है..आप प्लीज और थोडा दर रुकीये .." पुन्हा आम्ही मोठ्याने ओरडलो " अंकल कल शाम से हम नागपुरसे निकले है..वहा मैत्री में भी हमे बहोत काम है..ऐसे इसके पीछे तो सारा दिन निकाल जायेगा ..हम जाते है " असे सांगून आमच्या पैकी दोन जण गाडीत जावून बसले ..तो आत मधून सगळा संवाद ऐकत होता आमचा ..रवीने मुद्दाम गाडी स्टार्ट केल्याचा मोठ्याने आवाज केला ..गाडी थोडी दूर नेली त्याच्या घरापासून ..आम्ही चार जण ..त्याच्या खोलीच्या मागच्या आणि पुढच्या दारांवर गुपचूप उभेच होतो ..गाडी स्टार्ट झाल्याचा मोठा आवाज ..आणि दूर जात असल्याचा आवाज ऐकून तो आत निश्चिंत झाला असावा ..त्याने हळूच खोलीचे मागचे दार उघडले ..बाहेर पडला तसे आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचे बकोट धरले ..त्याला धक्काच बसला ..आपल्याला यांनी उल्लू बनवले हे समजून चुकला तो ..मग म्हणू लागला ..सिर्फ एक बर गलती हो गई..इस बार माफ करो ..अगली बार गलती हुई तो फिर आप कहेंगे उतने दिन रहूंगा मैत्री में..त्याच्या विनवण्या कडे दुर्लक्ष करत आम्ही त्याला गाडीत बसवले ..
वाटेत आम्ही त्याची खूप फिरकी घेतली ..मुर्खा तुला जर फक्त आॅम्लेटच खायचे होते तर ..मग दारू का प्यायला ..यावर तो म्हणाला .." घरसे पैसे चुराने के बादमें मेरे मन में अपराधीपन की भावना जाग गई..बहोत डर लगने लगा..तो डर को मिटाने के लिये शराब पिया " त्याचे म्हणणे अगदी खरे होते ..प्रत्येक व्यसनी खुप भावनाप्रधान असतो ..व्यसनमुक्त राहताना जरी तो दारू पीत नसला तरी ..हे अति भावनाप्रधान असणे लवकर जात नाही..भावनिक संतुलन साध्य करण्यास वेळ लागतो ..तो कुठल्या तरी इछेच्या आहारी जावून काहीतरी चूक करतो मग त्याला पश्चाताप होतो ..अपराधीपणा वाटतो ..त्यातून पुन्हा दारू पिणे सुरु होते ..म्हणून आम्ही केंद्रात उपचार घेणाऱ्या मित्रांना नेहमी सांगत असतो की एखादी कृती करण्यापूर्वीच खूप विचार करा ..त्या कृतीचे काय काय परिणाम होऊ शकतील याचा सर्व बाजूनी विचार करा ...मगच कृती करा ..एकदा कृती करून झाली कि मग ..जर ..तर.. करून फायदा नसतो ..मग फक्त परिणामांना सामोरे जावे लागते ..त्याची आॅम्लेट खाण्याची इच्छा काही फार चुकीची नव्हती ..मात्र त्याच्या घरी ते चालत नव्हते ..अशा वेळी त्याने जर आम्हाला फोन करून सांगितले असते प्रामाणिकपणे.. तर आम्ही त्याच्या वडिलांशी बोलून त्यांना समजावले असते ..त्याला आॅम्लेट खावू द्या असे सांगितले असते ..वडिलांनी आमचे ऐकलेही असते नक्की ..समुपदेशक हा कुटुंबीय आणि व्यसनी यांच्या मधील दुवा म्हणून देखील काम करतो .. व्यसनमुक्तीचे उपचार घेवून घरी व्यसनमुक्त रहात असताना जर कुटुंबीय आणि व्यसनी यांनी वेळोवेळी काही कौटुंबिक न भावनिक समस्या उद्भवल्या असता ..एकमेकात सुसंवाद नसल्याने समुपदेशकाला मध्ये घातले तर अधिक सोपे होते काम .
नंतर त्याने पुन्हा तीन महिने उपचार घेतले आमच्याकडे ..वार्डात सगळे त्याला ' बहोत महेंगा पडा आॅम्लेट ' असे चिडवत असत ..त्याच्या उपचारांच्या दरम्यान आम्ही वडिलांना देखील समुपदेशन केले ..व्यसनमुक्त असला तरी तो अगदी सोज्वळ होईल ताबडतोब असे नसते ..त्याच्या विचारात आणि भावनिकतेत बदल होण्यास बराच वेळ लागतो .,,तुमच्या अपेक्षा त्याच्यावर न लादता सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न केला तर व्यसनमुक्ती बळकट होत जाते ..तुम्ही या पुढे हवे तर घरी अंडी आणू नका मात्र त्याला महिन्यातून एखादेवेळी बाहेर जावून आॅम्लेट खाण्यास परवानगी देण्यास हरकत नाही ..वडिलांना देखील ते पटले .. या वेळी त्याने तीन महिने उपचार घेतले ..पुन्हा एकदा सगळा आजार समजावून घेतला ..कोणत्याही समस्येचे उत्तर दारू पिणे नाही ..दारू प्यायल्याने उलट समस्या वाढते हे त्याला चांगलेच उमगले होते ..या गोष्टीला आता सहा वर्षे झाली ..तो आता छान व्यसनमुक्त रहात आहे ..वडिलांच्याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतोय ..लग्नही केलेय त्याने ..अधूनमधून आम्हाला फोन करून खुशाली कळवतो ..मुख्य म्हणजे आता नाॅनव्हेज खाणे बंद केलेय ..उगाच माझ्या एकट्याच्या त्या वर्तनाने कुटुंबियांना दुखः नको असे म्हणतो !
( समाप्त )

महागडे आॅम्लेट ( भाग दोन )


आमच्याकडे जबरदस्तीने उचलून आणून उपचारांना दाखल दाखल केल्यावर बहुतेकांना एकदम साक्षात्कार होतो आपल्या घरातील वाईट वर्तनाचा..दारू पिणे चांगले नाही याचा ..ते लगेचच जाहीर करतात ..आता मी दारू सोडली म्हणून ..अर्थात हे तात्पुरते असते ..व्यसनमुक्ती केंद्रातून ताबडतोब आपल्याला सोडून द्यावे म्हणून व्यसनी वेळ प्रसंग पाहून पावित्रा बदलतो ..यानेही उपचारांच्या दरम्यान आमच्याकडे स्वता:च्या चुकांची कबुली दिली ..सर्व उपचारात सामील होत ..आम्हाला चांगले सहकार्य केले .. ..समुपदेशनाच्या वेळी त्याला आम्ही विचारले त्याच्या पायलट होण्याच्या स्वप्नाबद्दल ..तुझ्या वडिलांचा पगार किती ? तसेच लहान बहिणीच्या लग्नाला येणारा संभाव्य खर्च ..त्यातून तुला पायलट करण्यासाठी लागणारा भरपूर पैसा वडील कोठून आणणार ? यावर त्याच्या कडे उत्तर तयार होते ..वडिलांच्या वाट्याला आलेली तीनचार एकर वडिलोपार्जित जमीन विकून वडिलांनी आपले स्वप्ना पूर्ण करावे असा त्याचा हट्ट दिसला ..बहुतेक व्यसनी व्यक्तींचा वडिलोपार्जित संपत्तीवर डोळा असतो ...तसेच कुटुंबाच्या संपत्तीबाबत तो अतिशय जागरूक असतो ..त्यातील आपला हिस्सा त्याच्या चांगलाच लक्षात असतो ..परंतु निसर्गाने दिलेल्या सगळ्यात किमती शरीराचे महत्व त्याला समजत नाही .. त्याला वडिलोपार्जित जमिनीशी वडिलांच्या भावना भावना कशा निगडीत असतात ..तसेच ती जमीन एखाद्या मोठ्या आजाराच्या वेळी .. आर्थिक अडचणीच्या वेळी उपयोगी येवू शकते म्हणून वडील ती विकण्यास नकार देत आहेत हे त्याच्या गळी उतरवावे लागले ..एकंदरीत सगळे समजून घेतले त्याने ..मग त्याने डी एड करणे वडिलांच्या दृष्टीकोनातून कसे व्यवहार्य आहे ..शिक्षकी पेशा कसा आदर्श आहे ..तू मुळचा हुशार आहेस उत्तम शिक्षक होऊ शकतोस याची वडिलांना खात्री आहे वगैरे ..समजावले ..त्याला सगळे पटतेय असे वाटले ..त्याचे वार्डातील वर्तन देखील चांगलेच होते ..आम्ही वार्डात आमचे गुप्तचर सोडलेले असतात ..ते गुप्तचर कार्यकर्ते ..उपचार घेणाऱ्या प्रत्येक व्यासानीचे बारकाईने निरीक्षण ( क्लिनिकल आॅब्जर्व्हेशन ) असतात ..त्यांचा देखील याच्या बाबतीत सकारात्मक अहवाल मिळाला होता म्हणून आम्ही याला एक महिना उपचार पुरेसा आहे असे ठरवून एका महिन्यांनी डिस्चार्ज दिला ..पालकांना डिस्चार्ज च्या वेळी ..याने परत काही हट्ट केला ..किवा काही गडबड केली तर आम्हाला फोन लावून द्या ..आम्ही त्याला समजावून सांगू अशी सूचना दिली ..
नंतर सुमारे तीन महिने सुरळीत गेले ..हा नोकरी साठी प्रयत्न करतोय असे समजले वडिलांकडून ..चला आता हा मार्गी लागेल असे वाटले आम्हाला ..पण कसचे काय ..चार दिवसांनी वडिलांचा दुपारी फोन आला की तो सकाळ पासून घरातून गायब आहे ..घरातून सकाळी एक हजार रुपये चोरून त्याने पोबारा केला होता ..वडिलांनी सविस्तर माहिती सांगितली फोन वर ..हा म्हणे गेल्या दोन दिवसांपासून मला ' आॅम्लेट ' खायची इच्छा आहे त्यासाठी मला पन्नास रुपये द्या म्हणून मागे लागला होता ..त्यांच्या घरी ' माळकरी ' वातावरण ..वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला ..दारू सोडलीस तसे आता हे नॉनव्हेज खाणे देखील सोड असे बजावले ..बहुधा सर्वच व्यसनींना दारू सोबत ' नॉनव्हेज ' खाण्याची सवय असते ..अनेकदा दारू बंद असली तरी त्यांना ' नॉनव्हेज ' खायची इच्छा होऊ शकते ..यात हा देखील धोका असतो की नॉनव्हेज खाताना दारू प्यायची पण इच्छा होते ..वडिलांनी नकार दिल्यावर दोन दिवस याने कटकट केली घरी ..तेव्हा वडील याला रागावले ..त्याने पूर्वी किती त्रास दिला आहे हे त्याला सुनावले ..त्याला तो अपमान वाटला ..त्याचे डोके फिरले ..सकाळी घरातून एक हजार रुपये चोरून तो पळाला ..तासाभरात वडिलांच्या लक्षात आले चोरी झाल्याचे ..नंतर दुपारी याचा दारू पिवूनच फोन आला ..तुम्ही मला आँम्लेट खायला पैसे दिले नाहीत म्हणून मी एक हजार रुपये घरातून चोरून ..दुसऱ्या गावी मित्राकडे आलोय ..मग वडिलांना त्याने शिव्या घातल्या ..माझ्या आयुष्याचे तुम्ही वाटोळे केले वगैरे आरोप केले ..एकदा याचे पिणे सुरु झाले की याला थांबता येत नाही हे माहित होते वडिलांना ..त्यांनी आम्हाला लगेच संध्याकाळी तुम्ही निघून मागील वेळे सारखे मध्यरात्री पोचा येथे ..तोवर तो हजार रुपयांची वाट लावून ..भरपूर दारू पिवून आणि पोटभर आॅम्लेट खावून घरी आलेला असेल ..त्याला पुन्हा घेवून जा उपचारांना असे सांगितले ..खरेतर आम्ही डिस्चार्जच्या वेळीच वडिलांना सूचना दिल्या होत्या की याने काही कटकट केली तर आम्हाला कळवा ..आम्ही त्याला समजावून सांगू म्हणून ..परंतु वडिलांनी आम्हाला तो ' आॅम्लेट ' खायचा हट्ट करतोय हे कळवले नव्हते ..त्यातून पुढे हे लफडे झालेले ..आम्ही ताबडतोब संध्याकाळी निघालो ..मध्यरात्री त्याच्या घरी पोचलो तेव्हा समजले की तो अजून घरी आलेला नव्हता ..कदाचित वडिलांनी आम्हाला फोन केल्याचा त्याला अंदाज आला असावा ..कारण त्याने एकदा रात्री दहा वाजता फोन करून वडिलांना परत शिव्या घातल्या होत्या ..मैत्रीच्या लोकांना सांगू नका नाहीतर जीवे मारून टाकीन तुम्हाला अशी धमकी दिली होती त्यांना ..इतक्या लांब जावून हात हलवत परतणे आम्हाला मानवणारे नव्हते ..आता कुठेतरी मुक्काम करून त्याच्या घरी परतण्याची वाट पाहणे भाग होते ..त्या छोट्या गावात कोणतेही लॉज नव्हते ..शेवटी पहाटे तीन वाजता आम्ही तेथून जवळ असलेल्या दुसऱ्या गावी जावून तेथील लॉज मध्ये एक खोली घेतली ..तीनचार तास आराम करावा म्हणून मुक्काम केला तेथे .
( बाकी पुढील भागात )

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

महागडे आॅम्लेट ! ( भाग एक )


छत्तीसगढच्या दुर्ग शहराजवळच्या गावातून फोन होता .मुलगा २५ वर्षाचा आहे ..दारूचे व्यसन लागलेय ..कोणाचे ऐकत नाही ..त्याला उपचार घेण्याबद्दल सुचवले मात्र तयार नाहीय ..तुम्ही येवून घेवून जा जबरदस्तीने ..मात्र ..आम्ही फोन केला होता म्हणून . आमचे नाव सांगू नका त्याला नाहीतर नंतर आमचा बदला घेईल तो ..बहुतेक पालक व्यसनीच्या ..उग्र विरोधाला ..त्याच्या रागाला ..आक्रस्ताळेपणाला घाबरतात ..म्हणून असे जबरदस्तीने पालखी करून उचलून आणण्याच्या वेळी ..आमचे नाव अजिबात कळू देवू नका ..नाहीतर नंतर तो आमचा बदला घेईल..अशी भीती आवर्जून व्यक्त करतात ..आम्हाला अशा पालकांना आधी समुपदेशन करावे लागते ...तुम्ही याला घाबरणे बंद करा म्हणून ..प्रत्येक व्यसनी आपल्या व्यसनाच्या आड येणाऱ्या लोकांना आपला शत्रू समजत असतो ..आणि आपले व्यसन निर्धोक सुरु राहावे म्हणून ..घरात दादागिरी करतो ..आरडाओरडा..वस्तूंची फेकाफेक ..आत्महत्येची किवा खुनाची धमकी ." मार डालुंगा ..तोड डालुंगा ..छोडूंगा नही ..सबक सिखाउंगा " ..वगैरे भाषा करतो..सर्वसामान्य माणसे घरात तमाशा नको ..उगाच बाहेरच्या लोकांना शोभा नको ..घराण्याचे नाव बदनाम होईल या भीतीने अथवा ..हा दारू पिवून आहे याच्या कोण नादी लागणार या सुज्ञ विचाराने चूप बसतात ..आणि व्यसनीचा आतंकवाद सुरु राहतो..खरेतर पालखी करून उचलून आणताना जरी आम्ही कोणी फोन केला हे सांगितले नाही तरी त्याला वार्डात उपचार घेताना कळतेच की हे काम पालकांच्या सांगण्याने आणि संमतीनेच झालेय ...आम्ही त्याच्या पालकांना धीर दिला ..मध्यरात्री तो गाढ झोपेत असताना त्याला उचलून आणायचे असे ठरले ..त्यानुसार आम्ही पाच जण संध्याकाळी नागपूरहून निघालो ..३५० किमी जायचे होते ..मध्यरात्री पोचलो ...छोटेखानी बैठे घर होते ..घरचे सगळे लोक जागेच होते .. आवाज न करता अंधारात आमची वाट पाहत बसून होते ..हा दारुडा मस्त मधल्या खोलीत राजासारखा गाढ झोपलेला...आम्ही हे काम कसे करणार याची घरच्यांना काळजी होती ...ती चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी ..काळजी करू नका ..तुम्ही सगळे बाजूला जा ..त्याच्या समोर येवू नका अजिबात असे त्यांना सांगितले ..आम्ही लाईट लावून त्याला उठवले ..करड्या आवाजात नाव विचारले ..एकदम असे चारपाच धिप्पाड लोक पलंगा भोवती पाहून तो घाबरलाच ..त्याला हे अनपेक्षितच असणार ..त्याने नाव सांगण्यापूर्वीच त्याला उचलले ..तो आई वडिलांच्या नावाने हाका मारू लागला ..मात्र घरातील सगळे लोक आधीच दूर जावून अंधारात त्याला दिसणार नाही असे उभे होते ..काय होतेय हे समजेपर्यंत तो गाडीत पोचला होता ..लगेच गाडी सुरु करून आम्ही निघालो ..
आम्ही नेमके कोण आहोत ..त्याच्या बालेकिल्ल्यात घुसून...त्याला उचलून कोठे घेवून चाललो आहोत या बद्दल मुद्द्दाम काहीच बोलत नव्हतो ..त्यामुळे तो अधिकच घाबरलेला .." आप हमे किडनॅप करके कहा ले जा रहे हो ? असे केविलवाणेपणाने विचारू लागला ..यावर आमचे कार्यकर्ते गमतीशीर उत्तरे देवून त्याला अजून गोंधळात टाकत होते .." आपको परमवीरचक्र मिलनेवाला है...उसी के लिये आपको दिल्ली बुलाया गया ही प्रधानमंत्री कि तरफ से " ..." आपकी दस करोड रुपये की लॉटरी लगी है " ..आप के उपर बलात्कार का इल्जाम लगा है..इसलिये इन्क्वायरी के लिये ले जा रहे है " अशी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे ऐकून तो पार ढेपाळला ..रडू लागला .." मुझे नही चाहिये परमवीरचक..नही चाहिये दस करोड..प्लीज मुझे छोड दिजीये .." अशी हात जोडून विनवणी करू लागला ..कार्यकर्ते त्याची अजून अजून मजा घेत होते .. मग अक्षरश: धाय मोकलून रडू लागला .." मुझे मार डालो ..खतम कर दो .." असे बडबडू लागला ..नंतर वाटेत .. पेशाब लगी है ..जोर की संडास आ रही है..म्हणून गाडी थांबवा अशी विनंती करू लागला ..आम्ही अशा वेळी सुरक्षित जागा पाहूनच गाडी थांबवतो ..कारण तो आरडा ओरडा करून गर्दी जमविण्याची शक्यता असते ..अगदी निर्जन जागा पाहून रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून ..त्याला धरून उतरवून ..मागून पँट पकडूनच लघवी करवली गेली..मला सोडून द्या ..तुम्हाला काय हवे ते देतो .अशी आर्जवे सुरूच होती त्याची ..सकाळी दहाला नागपूरला पोचलो ..आपल्याला जबरदस्तीने उचलून व्यसनमुक्ती केंद्रात आणले गेलेय हे समजल्यावर तो जरा मोकळा झाला ..हे लोक डाकू अथवा पोलीस नाहीत हे कळल्यावर त्याचे ओझे उतरले मनावरचे ..मग मी जास्त दारू पीत नाही ..कधी कधी पितो ..आजपासून सोडली ..असे शपथपूर्वक सांगू लागला .." प्लीज एक फोन करने दो घरको ..मेरे पिताजी बहोत बिमार है..वो चिंता में होंगे..." असे म्हणू लागला ..शेवटी त्याला समजले की येथे आर्जवे .विनंत्या ..रडणे..वगैरेचा काहीही फायदा होणार नाहीय ..तेव्हा नाईलाजाने शांत झाला ..चारपाच दिवसात उपचारात सहभागी होऊ लागला ..
दरम्यान वडिलांकडून आम्ही सगळी माहिती काढली त्याच्या बद्दल ..वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते ..एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना ..हा मोठा ..मॅट्रीक पर्यंत चांगला हुशार ..नंतर ..कॉलेजला गेल्यावर बिघडू लगला ..जेमतेम मार्कांनी बारावी झाला ..मग वडिलांनी त्याला डी.एड करवले ..त्याच काळात केव्हातरी अधून मधून दारू पिणे सुरु झालेले ..मोठी मोठी स्वप्ने पाहू लागला ..त्याचा एक मित्र बारावी करून दिल्लीला खाजगी संस्थेत पायलट होण्याचे ट्रेनिंग घेत होता ..याच्या डोक्यात ते पायलट होण्याचे वेड शिरले..डी.एड झाले तरी नोकरीसाठी प्रयत्न करेना ..दिल्लीला जावून पायलट होणार असा आग्रह करू लागला ..वडील बिचारे प्राथमिक शिक्षक ..याला खाजगी संस्थेत दाखल करून मोठी फी भरून ..होस्टेल मध्ये ठेवून.. पायलट करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते ..मला मनासारखा कोर्स करू देत नाही म्हणून याचे पिणे वाढले ..पिसाळल्यागत झाला ..रात्री बेरात्री घरी येणे ..शिवीगाळ ..आदळआपट..दावेदार असल्यासारखा वागू लागला..शेवटी वडिलांनी कोठून तरी माहिती काढून आम्हाला फोन केला होता ..वडील तसे सरळमार्गी शिक्षक असल्याने याच्या नादी लागले तर अपमान होतो ..एखादेवेळी आपल्यावर हात उचलेल ..या भीतीने चूप बसत होते इतके दिवस ..आणि याची आईला आपल्या मुलाच्या मनासारखे होत नाहीय म्हणून बिचारा दारू पितो या सहानुभूतीच्या भावनेत त्याचे हे वागणे सहन करत होती ..आम्हाला तसा तो घाबरट वाटला ..आईवडील समजतात तितका खतरनाक तर अजिबातच नव्हता ..दारू पिवून उगाच घरी उसने अवसान आणून भांडत असावा ..आमच्याकडे काही दिवसातच सुतासारखा सरळ वागू लागला ..माझी चूक झाली ...या पुढे दारू पिणार नाही ...जवाबदारीने वागेन सांगू लागला.
( बाकी पुढील भागात )

मर्डर ? ? ( भाग दोन )


ती प्रौढ स्त्री त्या व्यसनीची आई होती ..ती अतिशय कळवळून माहिती सांगत होती ..तिच्या चेहऱ्यावर अपराधी पणाचेही भाव दिसले ..व्यसनी मुलाचे तो व्यसनमुक्त होईल या आशेने आपण लग्न करून देवून मोठी चूक केल्याचे तिला उमगले होते ...सकाळपासून पिणे सुरु झाल्यावर याने कामधंदा बंद केला होता ..यांची दोन ताडीविक्री दुकाने होती .एका दुकानावर मोठा भाऊ बसे ..तर दुस-या दुकानावर हा बसत असे ..दहावी झाल्यावर पुढे शिक्षणात रस नाही म्हणून याला दुकान दुकानात बसवायला सुरवात केली होती ..लहान वयात हातात पैसे खेळू लागले ..शिवाय दुकान मालकाचा रुबाब ..अशा वेळी कुसंगत लागायला वेळ लागत नाही ..याच्या खिश्यात खुळखुळते पैसे पाहून वाईट मार्गाला लागलेले भोवती जमू लागले ..मग पार्टी ..सण..उत्सव अशा निमित्ताने दारू पिणे सुरु झाले ..आधी आठवड्या पंधरा दिवसातून एकदा प्रमाण होते ..मग ते वाढत जावून रोज रात्री वर आले ..आणि गेल्या दोन महिन्यांपासून सकाळ संध्याकाळ पिणे सुरु झालेले ..लग्न होऊन खूप स्वप्ने उराशी घेवून आलेल्या पत्नीला याचे पिणे पसंत नव्हते ..ती हा पिवून आला की भांडण करे..उणेदुणे काढे ..याला राग येवून हा तिला चूप बसवण्यासाठी मारझोड करू लागला ..त्या दिवशी सकाळी सकाळी हा पिवून आलेला पाहून ..बायकोने कटकट सुरु केली ..आरोप प्रत्यारोप सुरु झाले ..मोठा भावू घरातच होता ..पत्नी जास्त बडबड करू लागल्यावर याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली .भावाला ते सहन झाले नाही ..भावू मध्ये पडला तर हा भावावरही चाल करून गेला ..आधी शिवीगाळी..धक्काबुक्की ..मग झटापट सुरु झाली ..इकडे पत्नीची बडबड सुरूच होती ..तिला चूप बसवण्यासाठी याने तिचे तोंड दाबून धरले ..मग थांब तुझी बोलती कायमची बंद करतो म्हणून रागात तिचा गळा आवळायला सुरवात केली ..ती अर्धमेली झाली ..भावाने तिला कसेबसे याच्या तावडीतून सोडवून ..याल धरून आतल्या खोलीत नेले ..तेथेही हा सुटकेची धडपड करू लागला ..त्या आवेशात कपाटाच्या आरश्यावर डोके आपटले ..आरसा फुटला ..याच्या डोक्यात काचेचा तुकडा लागून खोल जखम झाली .. आपल्या डोक्यातून येणारे रक्त पाहून हा चिडून भावावरही चाल करून गेला ..कोपऱ्यातील घेवून भावावर धावला ..सुमारे अर्धा तासभर हे नाट्य सुरु होते ..आज नक्कीच कोणाचा तरी बळी जाणार या भांडणात हे म्हातारीला उमगले ..
पूर्वी कधीतरी तिचा एक नातलग आमच्याकडे मैत्री मध्ये दाखल होता उपचारांसाठी ..तेव्हा तिला व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माहिती मिळालेली ..भविष्यात कधी गरज पडलीच तर जवळ असावा म्हणून तिने आमचा फोन नंबर जपून ठेवलेला ..या सगळ्या गडबडीत तिने घाईने आम्हाला फोन लावला होता .." बरे झाले साहेब आपण याला घेवून आले ..नाहीतर कोणाचा तरी मर्डर नक्की झाला असता " सगळ्या घराला भोगावे लागले असते ..असे म्हणत तिने आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ..मग आता पुढे कसे या विचाराने कपाळाला हात लावून हताश बसून राहिली ..मोठा भावू निर्व्यसनी होता ..तो समजूतदार वाटला ..साहेब याला वाट्टेल तितके दिवस आपण ठेवा इथे ..मात्र पूर्ण बरा करा ..पुन्हा अजिबात दारू प्यायला नाही पाहिजे असे औषध द्या ..असे सांगू लागला आम्हाला ..आम्ही त्यांना धीर दिला ..आपण नीट उपचार करू ..तुम्ही फक्त आमच्या सूचनांचे पालक करणे आवश्यक आहे असे सांगितले ..त्यांची तशी तयारी होतीच ..तो व्यसनी संध्याकाळी झोपेतून उठल्यावर पूर्ण भानावर आलेला होता ..सकाळी आपल्या हातून काय घडलेय या जाणीवेने मनातून शरमलेला होता ..सुमारे आठवडाभर तो नुसताच उदास कोपऱ्यात बसून राही ..त्याला सर्व उपचारात सहभागी होण्यासाठी वारंवार प्रेरणा द्यावी लागली ..त्याला इकडे आणल्यावर त्याच्या पत्नीला दोन दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले होते ..याने गळा आवळल्याने तिला बसलेला मानसिक धक्का फार मोठा होता ..दोन दिवसांनी ती भानावर आल्यावर ..तिचे वडील तिला माहेरी घेवून गेले ..हा स्वभावाने तसा साधाभोळा वाटला ..दारू प्यायला सुरवात करून जेमतेम दोन वर्षे झाली होती ..अजून पूर्णतः कसलेला..खोटारडा ..नाटकी दारुडा झालेला नव्हता ...काही दिवसातच आमच्यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला ..आमच्या सूचनांचे तंतोतंत पालन करू लागला ..उपचारांचा एक महिना पूर्ण झाल्यावर आम्ही त्याला डिस्चार्ज देण्याचे ठरवले ..मात्र त्याला ताडीच्या दुकानावर अजिबात बसू द्यायचे नाही असे कुटुंबियांना बजावले ..शक्य झाले तर काही दिवस याच्या मित्रांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच पत्नी आणि याच्यात निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी ..त्याच्या मामांकडे गावी पाठवून द्या असे सांगितले ..याने देखील आम्ही आणि कुटुंबीय जे ठरवतील ते मान्य आहे असे सांगितल्यावर त्याला डिस्चार्ज केले गेले ..!
त्या नंतर सुमारे सहा महिन्यांनी तो पत्नीसह भेटायला सेंटरला आला होता ..पत्नी खुश होती खूप ..आमच्या सल्ल्यानुसार हा नागपूर सोडून हैद्राबाद येथे मामाकडेच राहू लागला होता ..तेथे यांची वडिलोपार्जित शेती होती ..त्याचा कारभार सांभाळू लागला .त्यात रमला देखील ..भेटायला आले तेव्हा त्यांच्याकडे खुशखबर होती ..लवकरच ते आई -बाबा बनणार होते ..त्यांच्या चेहऱ्याचे समाधान .आनंद पाहून आम्हालाही खूप छान वाटले ..आमच्या कामाची ही यशस्वी सांगता होती ..त्याच्याकडून आम्हाला मिळालेले सर्वात मोठे बक्षीस म्हणजे त्याची व्यसनमुक्ती ..हे बक्षीस आम्हाला पुढील वाटचालीसाठी मोठी संजीवनी होती ..फरसा शकलेला नसून देखील त्याने व्यसन आपल्यासाठी घातक आहे ..ही सहज सोपी गोष्ट आमच्याकडून शिकून घेतली होती ..जे मोठ्या मोठ्या पदवी धारकांना .अनेक उपचारात शिकता येत नाही.. ते तो केवळ एक महिन्यात शिकला होता ..या गोष्टीला आता सहा वर्षे होऊन गेली ..तो छान व्यसनमुक्त राहत आहे ..एक मुलगी आहे ..मर्डर होऊ शकतो ..या फोनचा शेवट .. " आम्हाला नवजिवन मिळाले " या वाक्याने झाला होता .
( समाप्त )

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

मर्डर ....? ?? ( भाग एक )


" हॅलो ..व्यसनमुक्ती आश्रम ..साहब आपल जल्दी यहाँपे आईये ..नही तो किसी का मर्डर होगा .." रवीने फोन जरा वेगळा आणि संशयास्पद वाटला म्हणून माझ्या हाती दिला ..तर फोन कट झाला ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..फोन करणारी एक बाई होती असे रवी म्हणाला ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन आला .." आप निकाल गये क्या ? जल्दी आईये ..बहोत मारामारी हो रही है.." " आप कौन बात कर रही हो ? ..क्या हुवा जरा विस्तार से बताईये.." असे रवीने म्हणताच ..पुन्हा फोन कट झाला ..कोणतातरी बोगस फोन असावा असे मी रवीला म्हणालो ..एक दोन वेळा आम्हाला असा अनुभव आलाय ..आमच्याकडे राहून गेलेला एखादा मित्र दारू पिणे परत सुरु झाले की..आमच्यावर राग काढण्यासाठी असा खोटा फोन करून आम्हाला फोन करून सांगतो की दारू पिणाऱ्याला उपचारांसाठी दाखल करायचे आहे ..तुम्ही लौकर येवून त्याला घेवून जा ..तो स्वतःहून यायला तयार नाहीय ..." मग तो एखादा खोटा पत्ता देतो ..तेथे गेल्यावर आम्हाला समजते की बोगस फोन होता म्हणून ..तसलाच प्रकार असावा हा असे मला वाटले ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन " साहेब ..आप कब पहुचेंगे ? जरा जल्दी .." रवीने त्यांना पत्ता विचारला ..घाईत त्या बाईने पत्ता सांगितला ..पलीकडून खूप गोंधळ आणि आरडाओरडा एकू येत होता असे रवीने सांगितले ..काय करावे काही कळेना ..पण पलीकडच्या बाईचा आवाज खूप घाबरलेला होता ..शिवाय बायका बहुधा असा खोटा फोन करत नाहीत असा आमचा अनुभव होता .शेवटी बघू तर खरी काय भानगड आहे ते ..म्हणून आम्ही चार कार्यकर्ते घेवून निघालो ..दारुडा नागपूरचाच होता ...सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होता पत्ता सांगितलेला भाग ..आम्ही त्या भागात पोचेपर्यंत पुन्हा दोन वेळा फोन येवून गेला ...तसाच घाबरलेला आवाज ..लवकर या नाहीतर मर्डर होईल अशी घाई करणारा ..
चौकशी करत एका गल्लीत शिरलो ..समोरा समोर बैठे बंगले असलेली ती गल्ली ..गल्लीत शिरताच जाणवले ..येथे काहीतरी घडतेय ..कारण प्रत्येक बंगल्याच्या गेट बाहेर त्या बंगल्यातील माणसे उभी होती ..गाडी पुढे जाऊ लागली तशी अजून गर्दी जाणवली ..अगदी कोपर्यातल्या बंगल्याकडे सगळी गर्दी पाहत होती ..आमची गाडी दिसताच ...त्या शेवटच्या बंगल्यासमोर उभी असलेली एक प्रौढ स्त्री मोठ्याने ओरडत गाडीसमोर आली..ती रडत होती ..केस मोकळे सुटलेले ..कपाळावरचे कुंकू विस्कटलेले ..आम्ही गाडी थांबवून खाली उतरताच ..ती हात जोडू लागली ..पायाजवळ वाकू लागली .." जल्दी अंदर जाईये ..जल्दी ." .तिची घाई सुरूच होती ..बंगल्याचे गेट सताड उघडेच ..दारही उघडे ..आम्ही घाईने घरात शिरलो ..तर समोरच दिवाणावर एक तरुणी उताणी पडलेली होती ...तिचे डोळे खोबणीतून बाहेर पडल्या सारखे उघडे ..मोठ्याने श्वास घेत ..अर्धमेल्या अवस्थेत पडून होती ..तिच्याजवळ जावून आम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला ..पण ती काहीच प्रतिक्रिया देईना ..तिचे डोळे ऊर्ध्व लागलेले ..तितक्यात आतल्या खोलीतून एका माणसाचा शिव्या देण्याचा आवाज ऐकू आला ..मग जमिनीवर काहीतरी आपटल्याचा आवाज ..आम्ही पळतच आतल्या खोलीत गेलो ..पाहतो तर त्या छोट्याश्या बेडरूम मध्ये ..खाली जमिनीवर रक्ताचे थारोळे ..आणि काचांचे तुकडे विखुरलेले ..दोन जणांची एकमेकांशी झटापट चाललेली ..तेथेच एक काठी पडलेली ..आम्ही ते पाहून आरडाओरडा केला ..तेव्हा त्यांची झटापट थांबली ..त्यांच्या पैकी एकाचे डोके फुटलेले असावे बहुधा ..त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या रक्ताचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले ..अत्यंत भेसूर चेहरा दिसत होता त्याचा ..त्या खोलीतील्या दुसऱ्या माणसाने .." इसको लेकर जावो साले को " असे आम्हाला ओरडून सांगितले .. खोलीत एकदम चारपाच जण शिरलेले पाहून तो भेसूर दिसणारा तरुण भांबावला ..त्याचा आवेश थंडावला . ..लवकर या असा फोन करणारी ती प्रौढ स्त्री बाई देखील रडत रडत त्या बेडरूम मध्ये आली " चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ येवून भेसूर दिसणाऱ्या तरूणाकडे बोट दाखवून ..याला ताबडतोब घेवून जा म्हणाली ..आम्हाला कळले की हाच व्यसनी असावा ..बेडरूम मधील कपाटाचा आरसा फुटून त्याच्या काचा सगळी कडे विखुरलेल्या आहेत हे दिसले .आम्ही चौघांनी त्याला धरले ..त्याला घेवून बाहेर आलो ..बाहेरच्या खोलीत दिवाणावर उताण्या पडलेल्या त्या तरुणी भोवती आता गर्दी जमलेली होती ..; यांना ताबडतोब दवाखान्यात न्या ..अशी सूचना देवून आम्ही बाहेर पडलो . त्या तरुणाला घेवून गाडीत बसलो .. ..त्याला गाडीत बसवतच देशी दारूचा भपकारा पसरला सगळ्या गाडीत पसरला ..तो आता शांत झाला होता ..मनातून घाबरला देखील असावा ..तो आम्हाला पोलीस समजत होता ....
सेंटरला आल्यावर ..त्या तरुणाला आधी अंघोळ घालून त्याचे कपडे बदलले ..त्याच्या कपाळाच्या वर डोक्याच्या भागात जखम झाली होती ..त्या जखमेचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर आले होते मघा.. अगदी टाके घालण्याईतकी मोठी जखम नव्हती ..मात्र खोल खोक पडली होती ..आम्ही त्याला मलमपट्टी केली ...त्याची विचारपूस सुरु केली ..हे कोणी मारले विचारले ..तर म्हणाला की मोठ्या भावाशी झटापट करताना ..माझे डोके कपाटाच्या आरशावर आपटून ..आरसा फुटला त्याची काच लागलीय डोक्याला .. काय घडले ते नीट सविस्तर सांग म्हणाल्यावर ..चूप झाला ..मग हुंदके देत रडू लागला..आता तो काही सांगण्याच्या अवस्थेत नाही हे जाणवले आम्हाला ..त्याला ग्लुकोज पाजून गुंगीचे औषध दिले ..मग तो रडत रडतच झोपला ..सुमारे तासाभराने ती प्रौढ बाई ..त्याचा मोठा भाऊ ..त्याचे कपडे घेवून सेंटरला आले ..अॅडमिशन फॉर्मवर त्यांच्या सह्या घेतल्या..नेमका काय प्रकार घडला ते भावाला विचारले ..तेव्हा भावाने सांगितले ..कि हा गेल्या दोन वर्षांपासून रोज रात्री दारू पितोय ..खूप समजावून सांगितले .पण कोणाचे ऐकत नव्हता ..म्हणून शेवटी लग्न झाले की सुधारेल असे वाटल्याने याचे लग्न करून दिले चार महिन्यापूर्वी .. मामाचीच मुलगी केली ..लग्न झाल्यावर जेमतेम आठवडाभर चांगला राहिला ..नंतर परत पिणे सुरु केले ..याच्या बायकोला याचे पिणे अजिबात आवडत नाही ..हा पिवून आला कि ती कटकट करते ..बडबड करते ..मला फसवले तुम्ही लोकांनी म्हणून आमच्याशी देखील भांडते ..ते याला सहन होत नाही . बायकोने बडबड केली ..की हा तिला एकदोन थपडा मारतो ..गप्प बस म्हणून ओरडतो ..रोजचा घरात हा तमाशा सुरु आहे ..गेल्या महिन्यापासून याने दिवसा देखील दारू पिणे सुरु केलेय .
( बाकी पुढील भागात )

चार्ल्स शोभराज ( भाग पाच )


दोन महिन्यांच्या उपचार खर्चाच्या रकमेवर पाणी सोडून देण्यास तयार होऊन आम्ही त्या व्यसनीला पळून जावू देण्याचे ठरवले होते ..एव्हाना त्या कुटुंबाकडून संस्थेला एकूण किमान पन्नास हजारांचा फटका बसला होता ..ठरल्याप्रमाणे त्या दिवशी आम्ही रवी व मी दुपारीजेवणासाठी घरी गेलो त्याच्या पळून जाण्याची व्यवस्था करून ..एरवी आम्ही असे घरी जाण्याच्या वेळी कार्यकर्त्यांना ..उपचारांना कोणी नवीन दाखल होणार असेल ..कोणी पालक चौकशीला येणार असतील ..कोणाचा डिस्चार्ज ठरलेला असेल ..तर तशा व्यवस्थित सूचना देवून घरी जात असू ..तसेच सर्वांवर नीट लक्ष ठेवा ही सूचना नेहमीचीच असते ..या वेळी मात्र त्याला निर्धास्त पळून जावू द्या ..अशी सूचना देताना कसेतरीच वाटत होते ..पण नाईलाज होता ..अजून जास्त नुकसान करून घेण्याची आमची तयारी नव्हती ..तसेच माणूस बदलू शकतो नक्की... अशी सकारात्मक भमिका नेहमी घेणारे आम्ही ..या केस मध्ये ..आणि याच्या कुटुंबियांच्या बाबतीत ..हे लोक कधीच बदलणार नाहीत ..या निष्कर्षाप्रत पोचलो होतो ...संध्याकाळी आम्ही परत सेंटरला आल्यावर ..काम फत्ते झाले ..अशी कार्यकर्त्याने बातमी दिली ..आम्हाला हायसे वाटले ...!
दुसऱ्याच दिवशी आमच्या त्या स्नेह्यांचा फोन आला ..म्हणाले ' अरे ..हा तिथून निघून कसा आला ..इथे आत्ता माझ्यासमोर बसलाय ..पळून आलो म्हणतोय .." ' अहो तो आता खूप नकारात्मक झालाय ..त्याच्या सुधारणेची शक्यता धूसर झालीय ..आम्ही दुपारी जेवणासाठी घरी गेलो असताना .कार्यकर्त्याला फसवून तो पळाला असावा...आता त्याला परत जबरदस्तीने उचलून आणण्यात काही अर्थ नाही ..नाहीतरी तीन महिने उपचार घेतलेच आहेत त्याने ..पाहू कसा राहतो ते बाहेर ..प्यायला लागला तर नंतर ठरवू परत काय करायचे ते " असे सांगून आम्ही त्या स्नेह्यांचे समाधान केले . नंतर तीन महिन्यांनी ..आमच्या एका दुसऱ्या हितचिंतक मित्राचा पुण्याहून फोन आला ..म्हणाला की त्यांचे एक नातलग ..नागपूरला राहतात ..त्यांच्या कंपनीत एक खूप हुशार ..मुलगा काम करतो ..बिचारा दारूच्या व्यसनात अडकलाय म्हणे ..बिझनेस मध्ये लॉस झाला ..जवळचे पैसे संपल्यावर त्याला त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले ..आपण फसवले गेले आहोत या भावनेने बिचारा खूप निराश झालाय म्हणून .. खूप दारू पितो ..त्याला तुमच्याकडे उपचार द्या ...आम्ही होकार देवून ..त्या नातलगांना आमचा फोन नंबर दे असे सांगितले त्या पुण्याच्या मित्राला ..नंतर त्या नागपूरच्या नातलगांचा देखील आम्हाला फोन आला ..आम्ही उपचारांची सर्व माहिती दिली ..म्हणाले त्याची फॅमिली त्याच्याकडे दुर्लक्ष करतेय ..उपचारांचा खर्च आम्हीच करणार आहोत त्याच्या वगैरे .. शेवटी त्यांना कोणाला दाखल करायचे आहे हे नाव विचारले..तर त्यांनी याचेच नाव सांगितले ..आम्ही हादरलोच ..म्हणजे याने नवीन बकरा पकडला होता तर ..रवीने त्यांना सावध केले ..याच्या भानगडीत पडू नका..आणि जमले तर आधी याच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवा ..हा एक नंबरचा फ्राॅड आहे ..आमच्या कडे तसेच इतर अनेक व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून झालेत याचे ..असे सांगून प्रकरण टाळले . नंतर पुन्हा तीन महिन्यांनी याचा स्वतःचाच रविला फोन आला ..सध्या व्यसनमुक्त आहे..पुण्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून ..तेथेच कार्यकर्ता म्ह्णून काम करतोय ..संचालकांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आहे ..वगैरे ..रवीने त्याचे अभिनंदन केले ..असाच चांगला रहा ...असे सांगितले ..रवीने जेव्हा मला हि बातमी सांगितली तेव्हा मी म्हणालो ..याने याने कापून ठेवली तरी हा सुधारतोय यावर माझा विश्वास बसने कठीण आहे ..कारण व्यसन करणे ही याची समस्या नाहीच आहे ...याची समस्या आहे संस्कारांची ..आणि टोपीबाजी ..फसवणूक ..गोड बोलून लोकांना आर्थिक फटका देणे ..ही सगळ्या कुटुंबाचीच समस्या आहे ...हे बाळकडू त्याच्या रक्तात भिनलेय.. जेव्हा किमान पाच वर्षे हा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात कडक वातावरणात राहील ..तेव्हाच काहीतरी आशा आहे ..तोवर जुने संस्कार पुसून नवे चांगले संस्कार करणे कठीण आहे याच्यावर ..मी उगाचच संशय व्यक्त करतोय असे वाटले असावे रविला असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसले ...
नंतर चार महिन्यांनी याचा फोन आला ..जयपूर येथे आमच्या व्यसनमुक्ती केंद्राची शाखा सुरु करत आहेत ..मला तेथील प्रमुख म्हणून नेमले गेलेय ..आता जयपूरला जातोय ..खूप छान चालले आहे माझे वगैरे ..रवीने मला सांगितले सगळे ..मी नुसतेच स्मित केले ..म्हणालो '' देखते रहो ..आगे आगे होता है क्या " ..नंतर सहा महिन्यांनी हा रवीच्या घरी सकाळी सकाळी हजर ..म्हणाला त्या केंद्रातील नोकरी सोडलीय ..आता तुझी सुधारणा चांगली झालीय ..तू बाहेर नोकरी करायला हरकत नाही असे त्या केंद्राच्या संचालकांनी सांगितले ..सध्या प्राॅपर्टी ब्रोकर म्ह्णून काम सुरु केलेय रवीने त्याला शुभेच्छा दिल्या ..मी समजलो की याने तेथेही भानगडी केल्या असतील म्हणून याला काढून टाकले असावे ..नंतर दोनच महिन्यांनी एका अनोळखी स्त्रीचा फोन आला रविला ..एका व्यक्तीला उपचार द्यायचे आहेत म्हणून ..तिने याचेच नाव घेतले ..याच्या आयुष्यात ही नवीन स्त्री कोण आली स्वतःला फसवून घ्यायला हा प्रश्नच पडला आम्हाला ..रवीने थातूर मातुर कारण देवून टाळले ...आत्ता एक बातमी उडत उडत आमच्या कानावर पडलीय ..कि ज्या आमच्या स्नेह्यांनी याचा भावाला ..वाहिनीला नोकरीला ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवला ..त्या स्नेह्यांना बिझनेस मध्ये नुकसान होवून व्यवसाय डबघाईला आलाय ..म्हणून ..मला खात्री आहे ..त्यातही नक्की या कुटुंबाचा वाटा असणार ..या लोकांनी त्यानाही मोठी टोपी घातली असणार ..हे लोक जिवंत आहेत तोवर हे दुष्टचक्र सुरु रहाणार ..प्रत्येक वेळी नवीन बकरा मिळणार यांना ..
अशा वेळी ..या लोकांना लवकरात लवकर चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना करणे हेच केवळ आपल्या हाती असते !
( समाप्त )

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

चार्ल्स शोभराज ( भाग चार )



दुसरे लग्न होऊन .पुन्हा घटस्फोट झाला ..आता तरी याचे आणि याच्या कुटुंबियांचे डोळे उघडतील असे वाटत होते ..मात्र तसे झाले नाही ..एकदा तर कहर असा झाला की..त्या व्यसनीच्या आईला जेव्हा रवीने सहज ..व्यसनीच्या भावाने ओव्हरड्राफ्टची सवलत घेवून बुडवलेल्या बँकेच्या भानगडी बद्दल ..नेमके काय झाले असे विचारले ..तेव्हा ती मोठी तोऱ्यात म्हणाली ..बघा ना हे बँकवाले कसे असतात .उगाचच अडकवलेय त्यांनी माझ्या मुलाला त्यात ..त्याने भले ओव्हरड्राफ्ट मागितला असेल ..त्यांनी द्यावाच का त्याला ? आता धंद्यात त्याला नुकसान झाले ..त्यात त्याचा काय दोष ? तिचे असे मुलाचे बाजू घेणे पाहून...आम्ही थक्कच झालो . सगळे कुटुंबच फ्राॅड होते एकंदरीत . नंतर मध्ये एक वर्ष गेले ..त्या काळात हा दोनतीन वेळा आमच्या सेन्टरच्या कार्यकर्त्यांना भेटला बाहेर ..मात्र पिणे सुरु होते ..एका कोणत्यातरी दुसऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार देखील घेवून झाले एक दोनदा ..मध्ये मध्ये बातम्या ऐकायला मिळत होत्या कि आता सगळे भाड्याच्या घरात राहायला आलेत ..भावू ..वहिनी ..खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत ..हा व्यसनी आपल्या इंग्लिश बोलण्याच्या जोरावर लहान मोठ्या नोकऱ्या मार्केटिंग च्या नोकऱ्या करतो ..दोन तीन महिन्यात नोकरीत काहीतर घोटाळा करून नोकरी सोडून देतो ..पुन्हा पुन्हा पिणे सुरूच रहाते..चला त्याच्या फसवणुकीच्या तडाख्यातून आपले सेंटर तरी सुटले आता... याच समाधानात होतो आम्ही ..पण कसचे काय ..एकदा आमच्या सेंटरला वेळोवेळी आर्थिक मदत केलेल्या ..तसेच सेंटरचे हितचिंतक असणाऱ्या आमच्या स्नेह्यांचा फोन आला आम्हाला ..की मी सदर व्यक्तीला तुमच्या कडे उपचार घेण्यास पाठवतोय ..ते याच्याच बद्दल बोलत होते ..हे समजल्यावर आम्ही त्या हितचिंतकांना स्पष्ट सांगितले ...की ते सगळे फ्राॅड लोक आहेत..फी भरत नाहीत सेन्टरच्या उपचारांची ..खोटे चेक देतात वगैरे ...त्यावर स्वभावाने अतिशय दयाळू असणारे आमचे स्नेही म्हणाले ..त्यांच्या फी ची जवाबदारी मी घेतो ..तेव्हा माझ्या विनंतीला मान देवून त्याला उपचारांसाठी दाखल करून घ्या ..त्या सगळ्या कुटुंबाचीच परिस्थिती आता खूप बिघडलीय ..त्यात याचे दारू पिणे अधिकच त्रासदायक होतेय त्यांना ..सेंटरला मदत करणारे स्नेही म्हणून आम्हाला त्यांचा शब्द मोडता आला नाही ..शिवाय त्याच्या उपचारांचा खर्च करण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती त्यामुळे नाईलाजाने आम्ही त्याला पुन्हा दाखल करून घेतले ..वारंवार होत असलेल्या रीलॅप्स मुळे तो पूर्ण नकारात्मक विचारसरणीचा झालेला होता ..त्याला समुपदेशन करण्याचा प्रयत्न व्यर्थच होता ..समस्या सगळ्या कुटुंबात होती ..प्रामाणिकपणे नोकरी न करता ..पैंश्याचे घोटाळे करणे..गोड बोलून लोकांकडून उसने पैसे घेवून आपल्या गरजा भागवणे ..क्लब ..उंची कपडे ..वगैरे मौजमजा इतरांच्या पैशावर करणे ..आपण सधन ..समृद्ध आहोत असा देखावा करत रहाणे ..आणि जगात मूर्ख लोक खूप आहेत ..वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांना टोप्या घालणे ..लोकांच्या चांगुलपणावर आपली चूल पेटती ठेवणे ..हा सगळ्या कुटुंबाचाच गुणधर्म बनला होता ..खरे तर त्या व्यसनी पेक्षा त्याच्या कुटुंबियांनाच समुपदेशनाची जास्त गरज होती ...
या वेळी उपचार देण्यात त्या मुलाच्या वाहिनीने पुढाकार घेतला होता म्हणे ..तिने पहिल्या महिन्याच्या फी चा नेहमी प्रमाणे चेकच दिला ..त्यांच्या लौकिकानुसार तो चेक बाउन्स झाला ..आम्ही ताबडतोब रोख पैसे भरा ..नाहीतर याला सोडून देवून असा दम दिल्यावर ..त्याच्या वाहिनीने रोख पैसे आणून दिले पहिल्या महिन्याच्या फी चे ..त्याला याला किमान सहा महिने तरी उपचार द्यावेत असे ..त्या स्नेह्यांनी सांगितले होते ..पुढे दोन महिने ..आज देतो.. उद्या देतो ..असे करत त्यांनी फी देणे टाळले ..व्यसनीला केंद्रात भेटायला येणे देखील बंद केले ..इकडे हा व्यसनी देखील मला डिस्चार्ज हवा असा रोज हट्ट करे शेवटी वैतागून आम्ही ...त्याच्या उपचारांसाठी गळ घालणाऱ्या आमच्या स्नेह्यांकडे गेलो ..त्यांना सर्व परिस्थिती सांगितली ..तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून थक्क झालो आम्ही ..त्या स्नेह्यांचा मोठा बिझनेस होता ..त्यात त्यांनी व्यसनीच्या बँक बुडवणाऱ्या भावाला ..वाहिनीला नोकरी दिली होती म्हणे ..तसेच या व्यसनीच्या सहा महिन्यांच्या उपचारांचे पैसे ५० , ००० ( पन्नास हजार ) आगाऊ त्याच्या वडिलांकडे त्यांनी दिले होते ..मात्र त्याच्या वडिलांनी ते पैसे आम्हाला न देता मध्येच गडप केले असावेत ..हे सगळे कुटुंब फसवेगिरी करणारे आहे हे मला माहित आहे ..तरी देखील मी त्यांना मदत करतोय ..कारण मला आशा आहे कि हे सुधारतील ..मी त्याच्या आई वडील ..भावू वहिनी ,सर्वांशी बोललो आहे ..की या पुढे तुम्ही प्रामाणिक पणे वागाल तरच मी तुम्हाला मदत करीन ..यावर त्यांनी तसे कबुल केले म्हणून मी त्यांना मदत करतोय असे त्या स्नेह्यांनी आम्हाला सांगितले ..मी देईन तुम्हाला त्याच्या उपचारांचे पैसे सगळे ..असे आश्वासन त्यांनी दिले ..मग आमचा नाईलाज झाला ..याच्या वडिलांनी मुलाच्या व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी मदत म्हणून मिळालेले पैसे देखील गडप केले आहेत ..हे ऐकून माझे डोकेच फिरले ..मी रविला म्हणालो ..यार या लोकांना जो पर्यंत एखाद खट भेटून यांना जेलमध्ये पाठवत नाही तोवर कदाचित यांचे डोळे उघडणार नाहीत ..लोकांच्या चांगुलपणाचा नेहमी गैरफायदा घेतात हे लोक ..जरी उपचार खर्चाचे सगळे पैसे तुम्हाला देतो आमच्या स्नेह्यांनी सांगितले होते तरी ..त्या चांगल्या व्यक्तीला खड्यात घालणे आम्हाला प्रशस्त वाटत नव्हते ..शेवटी मी एक प्लान केला ..या व्यसनीला सेंटर मधून पळून जाण्यास मदत करण्याचा .. व्यसनमुक्ती केंद्राच्या इतिहासात झालेली ही पहिली घटना असावी ..जेथे केंद्राचे प्रमुख कार्यकर्तेच व्यसनीला केंद्रातून पळून जाण्यास मदत करणार होते ..मी माझा प्लान रविला सांगितला ..नाहीतरी याचे वडील पैसे भरणार नाहीत हे नक्की झालेय ..आपले स्नेही कितीही दयाळू असले तरी ..या लबाड कुटुंबाला मदत करण्याच्या नादात आंधळे झालेत ..त्यांच्याकडून याच्या उपचाराचा खर्च पुन्हा मागणे आपल्याला प्रशस्त वाटत नाहीय ..कारण त्यांनी सहा महिन्याच्या उपचारांचे दिलेले पैसे याच्या वडिलांनी गडप केलेत ..आता पुन्हा त्यांना भुर्दंड का द्यायचा आपण ..शिवाय तो व्यसनी देखील केंद्रात नीट शांत राहत नाहीय ..सारखा डिस्चार्ज साठी हट्ट करून डोके खातोय ..तेव्हा याला पळून जावू दिलेले बरे ..रविला पटले माझे म्हणणे ...मग आम्ही आमच्या एका निवासी कार्यकर्त्याला विश्वासात घेवून आमचा प्लान समजावून सांगितला ..दुपारी रवी आणि मी दोघे जेवणासाठी घरी जावू तेव्हा ..मुद्दाम प्रमुख गेट उघडे ठेव ..त्या व्यासानीला बाहेर बोलावून सांग ..की तुला त्याची दया आलीय ..म्हणून तू त्याला पळून जाण्यास मदत करत आहेस ..गेट उघडे आहे ..जा पटकन निघून असे म्हणून त्याला पळून जावू दे घरी .
( बाकी पुढील भागात )